अभिजीत दीपके यांच्याविरोधातील दबावाचे राजकारण खपवून घेणार नाही; ऑल इंडिया पँथर सेनेचा राहुल दुबालेंना थेट इशारा
गेवराई तालुका :(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) दीपके यांनी माफी का मागावी? धमकी देणाऱ्यांनीच जनतेसमोर खुलासा करावा- नितीन सोनवणे अभिजीत दीपके यांच्याविरोधात काही पक्ष व संघटनांकडून सुरू असलेल्या मागण्यांना ऑल इंडिया पँथर सेनेने जोरदार विरोध करत थेट एल्गार पुकारला आहे. दीपके यांच्या खासगी निवासस्थानी पोलिसांच्या वर्तनावर त्यांनी आक्षेप घेत पोलिसांना गेटबाहेर जाण्यास सांगितल्याच्या प्रकारावरून त्यांच्याकडून माफी मागण्याची तसेच पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी करणे म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली दबावाचे राजकारण करण्याचा प्रकार असल्याचा घणाघाती आरोप पँथर सेनेने केला आहे.
‘एखाद्याच्या घरात घडलेल्या प्रकारावरून त्याला जाब विचारण्याचा अधिकार कोणाला दिला? स्वतःच्या घरात आपल्या सुरक्षिततेबाबत भूमिका मांडणे हा गुन्हा आहे का?’ असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
अभिजीत दीपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असून तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवितात. त्यांच्या भूमिकेशी कोणाचे मतभेद असतील तर त्यांनी ते संविधानाच्या चौकटीत आणि कायदेशीर मार्गाने मांडावेत. मात्र मतभेदाच्या नावाखाली धमकी, दबाव आणि दहशतीची भाषा वापरण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पँथर सेनेने दिला.
‘हात काढू’ म्हणणाऱ्यांना पँथर सेनेचा सवाल
दुबाले यांनी कथितरीत्या वापरलेल्या ‘हात काढू’ या भाषेवर पँथर सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.
‘दुबाले कायदा आणि संविधानापेक्षा मोठे आहेत का? लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार आहे; मात्र धमकी देण्याचा परवाना कोणालाही मिळालेला नाही,’ असा सवाल संघटनेने केला.
‘हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या धमकीने नाही!’ असे स्पष्ट करत संघटनेने धमकीची भाषा करणाऱ्यांना आपल्या वक्तव्याचे गांभीर्य समजून घेण्याचा इशारा दिला.
माफी दीपके यांनी नव्हे,
धमकी देणाऱ्यांनी मागावी!
ऑल इंडिया पँथर सेनेची भूमिका स्पष्ट आहे. अभिजीत दीपके यांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. उलट ‘हात काढू’सारखी भाषा वापरणाऱ्यांनी ती भाषा का वापरली, कोणाला उद्देशून वापरली आणि त्यामागे नेमका हेतू काय होता, याचा खुलासा जनतेसमोर करावा, अशी मागणी संघटनेने केली.
मतभेद असतील तर समोरासमोर चर्चा करा; कायदेशीर मार्गाने लढा द्या. पण धमकी देऊन आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. लोकशाहीमध्ये व्यक्तीचा आवाज दाबता येत नाही, असा इशाराही पँथर सेनेने दिला.
दबावाच्या राजकारणाला ठोस उत्तर देऊ!
एखाद्या व्यक्तीने आपल्या घरातील सुरक्षेबाबत किंवा पोलिसांच्या वर्तनाबाबत आक्षेप घेतला म्हणून त्याच्यावर राजकीय दबाव आणणे, माफीची मागणी करणे अथवा पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी करणे हा प्रकार लोकशाही मूल्यांना धरून नाही, अशी भूमिका पँथर सेनेने मांडली.
‘संविधान हातात घेऊन लोकशाहीच्या मैदानात या; धमकीची भाषा घेऊन नाही. अन्यथा अशा दबावाच्या राजकारणाला रस्त्यावर आणि कायद्याच्या चौकटीत दोन्ही ठिकाणी योग्य उत्तर दिले जाईल,’ असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी दिला आहे.






















