किरकोळ घरगुती वादातून थरारक घटना; आरोपी भाऊ ताब्यात
आशिष कोटकर( वरोरा-भद्रावती प्रतिनिधी ) : शहरातील भद्रावती येथील झिंगुजी वॉर्ड परिसरात मंगळवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घरगुती वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली. सख्ख्या भावाने आपल्या अविवाहित बहिणीवर तलवारीसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा जागीच खून केला, तर तिला वाचविण्यासाठी धावलेल्या आईवरही जीवघेणा हल्ला करून तिला गंभीर जखमी केले.
मृत युवतीचे नाव संजीवनी शंकर भोंडे (वय ३२) असे असून ती अविवाहित होती. आरोपी भाऊ सूरज शंकर भोंडे (रा. झिंगुजी वॉर्ड, भद्रावती) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
किरकोळ कारणावरून वाद विकोपाला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. आई-मुलगी आणि मुलगा-वडील असे वेगवेगळे स्वयंपाक करून राहत होते. घटनेच्या दिवशी किरकोळ कारणावरून — भाजी हिसकावून घेतल्याच्या वादातून — संतापलेल्या आरोपीने तलवारीसारखे धारदार शस्त्र उचलून बहिणीवर वार केले.
अचानक झालेल्या हल्ल्यात संजीवनी गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलीला वाचविण्यासाठी धावलेल्या आईवरही आरोपीने हात व पायावर वार करून तिला गंभीर जखमी केले.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस स्टेशन येथील पथक घटनास्थळी दाखल झाले. डीबी स्क्वॉडच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
जखमी आईची प्रकृती चिंताजनक असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
घरगुती वादातून घडलेल्या या थरारक घटनेमुळे झिंगुजी वॉर्ड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.






















