Times Of Maharashtra : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज (दि. 20) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गोविंद पानसरे हत्या प्रकरण : नेमके काय घडले होते?
कॉम्रेड गोविंद पानसरे हे ज्येष्ठ डाव्या विचारांचे नेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये मॉर्निंग वॉकहून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले होते, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरे याही जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले.
या प्रकरणात एसआयटीने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना अटक केली होती. मात्र, तपासावर पानसरे कुटुंबीयांनी आक्षेप घेत हा तपास एटीएसकडे सोपवावा, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार 2022 मध्ये उच्च न्यायालयाने तपास एटीएसकडे सोपवला.
9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने दहा संशयितांवर हत्या व हत्येचा कट रचल्याचे आरोप निश्चित केले होते. यामध्ये समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, सचिन आंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, शरद कळसकर आणि भरत कुरणे यांचा समावेश होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.






















