प्रवीण चौधरी (परभणी, प्रतिनिधी) : राज्यभरातील सुमारे ८५ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या फरकासाठी सरकारकडून दरमहा ६५ कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही ही रक्कम अद्याप एसटी महामंडळाला मिळालेली नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
परभणी दौऱ्यावर असताना काँग्रेस भवन येथे झालेल्या एसटी कर्मचारी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
बरगे म्हणाले की, सरकारची अब्रू राखण्यासाठी एसटी महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतूनच कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा फरक अदा केला, त्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे.

सध्या एसटी महामंडळावर
पीएफ, ग्रॅज्युटी, बँक कर्ज आदी मिळून तब्बल ४,१५१ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अर्थ खात्याकडून उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणीच होत नसल्याने एसटी महामंडळ आर्थिक कचाट्यात सापडले आहे, असा आरोप करत
या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच परिवहन मंत्र्यांची पुन्हा भेट घेणार असल्याचेही श्रीरंग बरगे यांनी स्पष्ट केले.






















