प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा पुणे येथील पाषाण तलाव येथे 10 एप्रिल 2026 रोजी घडली. हजारो माशांच्या मृत्यूची ही घटना केवळ जैवविविधतेच्या ऱ्हासाचा पुरावा नसून, शहरी जलपरिसंस्थेतील बिघाड, नियोजनातील त्रुटी, मानवाची आर्थिक भूक आणि जनजागृती यासारख्या असंख्य प्रश्नांना जन्म देते. पाषाण तलाव हा रामनदीवर बांधलेला मानवनिर्मित तलाव पुण्याच्या पश्चिम भागातील जलपरिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक असून त्याचे जलसंचय क्षेत्र सुमारे 40 चौ.कि.मी. आहे. हा तलाव स्थलांतरित पक्षी, जलचर प्राणी आणि स्थानिक परिसंस्थेसाठी तो एक संवेदनशील अधिवास (sensitive habitat) म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही दशकांत झालेल्या अनियोजित शहरीकरणामुळे या तलावाच्या पर्यावरणीय संतुलनावर मोठा परिणाम झाला आहे.
या मासे मृत्यूमागील प्रमुख कारण म्हणजे तलावात मोठ्या प्रमाणावर येणारे अपुरे प्रक्रिया केलेले सांडपाणी. उपलब्ध अहवालांनुसार, दररोज सुमारे 10 ते 12 MLD (मिलियन लिटर प्रति दिवस) सांडपाणी या तलावात मिसळत आहे, तर तलावाजवळील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची (STP) क्षमता केवळ 1 MLD इतकीच आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय आणि रासायनिक प्रदूषके थेट तलावात प्रवेश करतात. तलावातील Chemical Oxygen Demand पातळी 700 mg/l पेक्षा जास्त नोंदवली गेली आहे, जी जलजीवनासाठी अत्यंत धोकादायक मानली जाते. उच्च COD म्हणजे पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असून ते विघटनासाठी अधिक ऑक्सिजन वापरतात, ज्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण Dissolved Oxygen झपाट्याने घटते. जेव्हा DO पातळी अत्यल्प होते, तेव्हा मासे आणि इतर जलचरांना श्वसनासाठी आवश्यक ऑक्सिजन उपलब्ध होत नाही आणि ते गुदमरून मरतात.
भौगोलिक दृष्टिकोनातून ही संपूर्ण प्रक्रिया “यूट्रोफिकेशन” (Eutrophication) या संकल्पनेशी संबंधित आहे. यूट्रोफिकेशन म्हणजे पाण्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरससारख्या पोषकद्रव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे जलवनस्पती आणि शैवाल यांची प्रचंड वाढ होणे. पाषाण तलावात जलकुंभ (water hyacinth) आणि इतर जलवनस्पतींची अनियंत्रित वाढ झालेली दिसून आली आहे. या वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर पसरून सूर्यप्रकाशाचा प्रवेश कमी करतात आणि प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया शिथिल करतात. शिवाय, रात्रीच्या वेळी या वनस्पती स्वतःच ऑक्सिजन वापरतात, ज्यामुळे DO पातळी आणखी कमी होते. या सर्व कारणांमुळे तलावातील जलपरिसंस्था एक प्रकारच्या “dead zone” मृत क्षेत्रामध्ये रुपांतरीत होते.
या घटनेमागे आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे STP सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची अकार्यक्षमता आणि तांत्रिक बिघाड. काही अहवालांनुसार, STP काही काळ बंद होते किंवा त्याचे कार्यक्षमतेने संचालन होत नव्हते, ज्यामुळे सांडपाणी थेट तलावात सोडले गेले. याशिवाय, चुकीच्या ड्रेनेज जोडण्या आणि नाल्यांमध्ये सांडपाणी मिसळणे अश्या अनेक समस्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या Environmental Status Report नुसार, शहरातील एकूण सांडपाण्यापैकी सुमारे 30 ते 40 टक्के सांडपाणी अजूनही पूर्णपणे प्रक्रिया न करता नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडले जाते. ही बाब केवळ पाषाण तलावापुरती मर्यादित नसून संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रातील जलप्रदूषणाच्या व्यापक समस्येचे मुळ आहे.
शहरीकरण आणि भू-वापरातील बदल हे या संकटाचे दीर्घकालीन कारण मानले जाऊ शकते. बावधन, पाषाण आणि बाणेर या परिसरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक विकास झाला आहे. या विकासामुळे नैसर्गिक जलवाहिन्या अडवल्या गेल्या, जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. नदी क्षेत्रात वृक्षतोडीमुळे हरित क्षेत्र कमी झाले त्यामुळे मृदेची धूप होते आणि तलावात व नदी क्षेत्रात गाळाचे संचयन होते. ज्यामुळे पाण्याची साठवण क्षमता आणि जलगुणवत्ता दोन्ही कमी होतात. या सर्व अभ्यासावरून तज्ञांच्या निरीक्षणानुसार पाषाण तलावातील मासेमृत्यू ही घटना केवळ एका घटकामुळे नव्हे, तर “multi-factor ecological failure” मुळे घडली आहे. या समस्येकडे आता केवळ भावनिक मार्गाने न पाहता वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून उपाय सुचवणे अत्यंत गरजेचे आहे.
या घटनेचे परिणाम बहुआयामी आणि दूरगामी आहेत. पर्यावरणीय स्तरावर, तलावातील जैवविविधता गंभीरपणे बाधित झाली आहे. मासे, उभयचर, सूक्ष्मजीव आणि पक्ष्यांची अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा तलाव एक महत्त्वाचे निवासस्थान आहे, परंतु जलप्रदूषणामुळे त्यांच्या येण्यावरही परिणाम होत आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून, तलावाचा Water Quality Index (WQI) मोठ्या प्रमाणात खालावला असून तो “polluted water body” या श्रेणीत गेला आहे. सामाजिक स्तरावर, तलावातून येणारी दुर्गंधी, डासांची वाढ आणि संभाव्य रोगांचा धोका स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. या घटनेमुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी पर्यावरणीय धोरणे आणि अंमलबजावणीतील त्रुटी तशाच आहेत त्यावर शाश्वत उपाय आणि अंमलबजावणी कधी होणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
या समस्येवर भौगोलिक आणि शाश्वत दृष्टिकोनातून खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सांडपाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. तलावात येणारे सर्व सांडपाणी योग्य क्षमतेच्या Sewage Treatment Plant (STP) मध्ये प्रक्रिया करूनच सोडले पाहिजे. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारते आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी “Environment Protection Fund” उभा करून व विविध समाजसेवी संस्था, नागरिक आणि प्रशासन स्थरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
बाणेर येथील 25 MLD क्षमतेच्या मोठ्या STP कडे सांडपाणी वळवणे हा प्रभावी उपाय आहे. यामुळे पाषाण तलावावरचा सांडपाण्याचा ताण कमी होईल. त्याचबरोबर Decentralized Sewage Treatment Systems द्वारे स्थानिक पातळीवर सांडपाणी प्रक्रिया करता येते. यामुळे मुख्य यंत्रणांवरील भार कमी होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
तलावातील जलवनस्पती नियमितपणे काढणे आवश्यक आहे. जलवनस्पती काढण्यासाठी शाश्वत व अत्याधुनिक उदा. जैविक व तांत्रिक पद्धतींचा वापर करता येऊ शकतो. तसेच पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी aeration systems उपयुक्त ठरतात. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून मासे आणि इतर जलचरांचे जीवन सुरक्षित राहील.
संपूर्ण कॅचमेंट क्षेत्राचे व्यवस्थापन केल्यास तलावात येणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते. नैसर्गिक नाले व जलवाहिन्यांचे पुनरुज्जीवन केल्यास पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत होईल आणि प्रदूषित पाण्याचा जालस्त्रोतात थेट प्रवेश कमी होईल.
तलावाभोवती हरित पट्टे तयार केल्यास प्रदूषण शोषले जाऊन पर्यावरणीय संतुलन राखले जाईल. हे जैवविविधतेसाठीही उपयुक्त आहे. योग्य land use planning केल्यास अनियोजित शहरीकरण टाळता येऊन तलावावर होणारा पर्यावरणीय ताण कमी होईल.
GIS व Remote Sensing सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलगुणवत्तेचे सतत निरीक्षण करता येते. यामुळे वेळेवर उपाययोजना करणे शक्य होते. त्याचबरोबर, तलावाभोवती buffer zones निर्माण केल्यास मानवी हस्तक्षेप मर्यादित राहील.
सुजान पुणेकरांनी पर्यावरणीय नियमांचे व कायद्यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना पर्यावरण संवार्धानामध्ये सहभागी करणे महत्त्वाचे आहे. स्वयंसेवी संस्था सुद्धा यामध्ये प्रभावी योगदान देऊ शकतात.तलाव संरक्षणासाठी “Lake conservation committees” समित्या स्थापन केल्यास नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण काम करता येइल.
पाषाण तलावातील मासेमृत्यू ही घटना आधुनिक शहरीकरणाच्या मर्यादा आणि पर्यावरणीय व्यवस्थापनातील त्रुटी यांचे जिवंत उदाहरण आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर करताना शाश्वततेचा विचार करणे अत्यावश्यक आहे. जर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात अशा घटना अधिक वारंवार आणि अधिक गंभीर स्वरूपात घडू शकतात. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यास “आज मासे मेले उद्या माणसे मारतील” अशी स्थिती उद्भवेल. वेळीच वैज्ञानिक दृष्टीकोन, भौगोलिक समज आणि सामूहिक जबाबदारी यांच्या आधारे पर्यावरण संरक्षण आणि पुनरुज्जीवन शक्य आहे.|






















