जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कालिंका माता चौकात तातडीने उड्डाणपूल उभारण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने दोन दिवसीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ३ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून उड्डाणपुलाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. कालिंका माता चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असल्याने सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विविध दिशांनी येणारी वाहने, अवजड वाहतूक तसेच पादचारी आणि दुचाकीस्वारांची वर्दळ यामुळे अपघाताचा धोका कायम आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाय म्हणून कालिंका माता चौकात उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. स्वाक्षरी मोहिमेत व्यापारी, वाहनचालक, कामगार, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मोहिमेदरम्यान भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, शांतनू नारखेडे, महेश पाटील, तुषार चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
तीन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या निर्णयाकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.






















