जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी समितीने एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
श्रीमती आक्कासाहेब प्रभावती गजाननराव गरूड माध्यमिक विद्यालय, बेटावद बु. येथील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाहीत तसेच भूमिहीन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना समितीने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, वार्षिक शालेय फी तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी जाण्या-येण्याचा खर्च, खेळ साहित्य व आवश्यक मदतही समितीकडून देण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही समितीने स्वीकारली आहे.
गावातील मुलांसाठी अभ्यासिका उपलब्ध असताना मुलींसाठीही सुरक्षित व सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय समितीने घेतला असून हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
निर्भय सेवा समितीचे अध्यक्ष मा. सचिनभाऊ शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याध्यापक श्री. एस. आर. निकम यांच्याकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी प्राप्त केली असून लवकरच सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना मदतीचे वितरण करण्यात येणार आहे.
या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने निर्भय सेवा समितीचे अध्यक्ष मा. सचिनभाऊ शर्मा आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.






















