गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत उन्हाळी हंगामात पैठण उजव्या कालव्यातून चार पाणी पाळ्या देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

संत ज्ञानपीठ, जायकवाडी धरण येथे ८ एप्रिल रोजी झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ उपस्थित होते. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पैठण उजव्या कालव्यावरील सिंचन सुविधांबाबत विविध मागण्या मांडल्या. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत विस दिवसांच्या अंतराने चार पाणी पाळ्या देण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीला मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली.
बैठकीत कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यामुळे सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चार पाणी पाळ्यांची आवश्यकता असल्याचे आमदार पंडित यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय, नदीपात्रातील बॅरेजचे उन्हाळ्यात पुनर्भरण करणे, कालव्याच्या चाऱ्या व वितरिकांची दुरुस्ती करणे, तसेच पैठण कालव्यासाठी नियोजित २५५ दलघमी पाणी पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देणे यांसारख्या मागण्याही मांडण्यात आल्या. अस्तरीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर कालव्याच्या वहनक्षमतेची त्रयस्थ यंत्रणेकडून चाचणी घेण्याची मागणीही करण्यात आली.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सिंदफणा नदीवरील बॅरेज परिसरातील रस्ते, तसेच विविध ठिकाणी एस्केप व पुलांची कामे करण्याबाबत मागण्या मांडल्या. या सर्व मागण्यांवर मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या निर्णयामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीला मोठा आधार मिळणार असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.






















