प्रवीण चौधरी (परभणी प्रतिनिधी) : वसुंधरा 5.0 अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोल्हावाडी ग्रामपंचायतीला रुपये ५० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, हरित उपक्रम आणि शाश्वत विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतीस भेट दिली.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील अभिलेखांची तपासणी करून स्वच्छता उपक्रम, हरित प्रकल्प तसेच विविध निधीअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीच्या कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत पुढील कामांसाठी मार्गदर्शनही केले.
यानंतर त्यांनी पी.एम. श्री केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत व जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळा येथे भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी अभ्यास, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
या भेटीदरम्यान श्री एस. आर. कांबळे (गट विकास अधिकारी), श्री मंगेश नरवाडे (गट शिक्षण अधिकारी), श्री गजानन वाघमारे (गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सेलू), श्री के. टी. कानडे (विस्तार अधिकारी – पंचायत), श्री पियूष केंद्रेकर (विस्तार अधिकारी – सांख्यिकी), श्री व्ही. आर. वाघमारे (विस्तार अधिकारी – आरोग्य), श्रीमती एम. एम. लोमटे (ग्रामपंचायत अधिकारी, कोल्हावाडी), डॉ. सय्यद तौफिक (समुदाय आरोग्य अधिकारी, कोल्हा) तसेच कोल्हावाडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.






















