Times Of Maharashtra Desk : महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम अद्याप वितरित न झाल्याने विद्यार्थ्यांना फी भरण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासही मज्जाव होत असल्याची बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते इकबाल अन्सारी यांनी मा. उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन देत शिष्यवृत्तीचा निधी तात्काळ वितरित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ८०० ते ९०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, उपलब्ध निधी अत्यंत मर्यादित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यात विलंब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची सक्ती रद्द करून तो किमान तीन वर्षांसाठी ग्राह्य धरावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रांच्या प्रक्रियेत अडकावे लागणार नाही आणि योजना अधिक विद्यार्थी-अनुकूल बनेल, असे अन्सारी यांनी नमूद केले.
अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य या निर्णयावर अवलंबून असल्याचेही अन्सारी यांनी स्पष्ट केले.






















