खेड शिवापूर :- खेड शिवापूर परिसरात हायवे पोलीस वाहतूक शाखेच्या कारवायांमुळे नागरिकांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे. रहदारी करणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, येथे काही महत्त्वाच्या टोल नाक्यावर एकाचवेळी 7 ते 9 अंमलदार तैनात केले जात आहेत. वाहतूक शिस्त राखण्याऐवजी हे अंमलदार नागरिकांवर दहशत निर्माण करून दंड मारण्याच्या भूमिकेत चिरीमिरी गोळा करण्यावर भर देत असल्याचा आरोप होत आहे.
विशेषत: गर्दीच्या वेळेत कारवाईचे प्रमाण वाढते. वाहनधारकांना किरकोळ कारणांवर थांबवून दंडाची पावती दाखवण्यापेक्षा थेट चिरीमिरी गोळा करण्याकडे अधिक लक्ष असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यामुळे सामान्य वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंमलदारांची अशी ‘जोरदार बॅटिंग’ पाहून वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी अधिकच गोंधळ निर्माण होत असल्याची टीकाही होत आहे.
काही संघटनांनी या कारवायांवर आक्षेप घेणार असून राज्याचे पोलीस महासंचालक, ADG हायवे पोलीस आणि ADG ट्राफिक यांना तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच काहींनी वाहतूक शिस्त राखण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवापूर मधील या ‘विशेष पद्धतीच्या’ कारवायांमुळे हायवे पोलीस वाहतूक शाखेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलीस शिपाईकडेही ई चलान मशीन
यासोबतीला काही अशीही परिस्थिती आहे की, त्या ठिकाणी असलेले शिपाई देखील ई चलान मशीन वापरात असल्याचे कळाले आहे. ही मशीन वरीष्ठ अधिकारीच वापरू शकतो असे नियम असताना या नियमाला धाब्यावर बसवले असल्याचे दिसत आहे.
यावर वरिष्ठ अधिकारी कधी कारवाई करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.






















