Times of Maharashtra Desk: वंदे मातरम हा केवळ एक गीत नसून भारताच्या स्वातंत्र्याचा आणि राष्ट्रभावनेचा महामंत्र आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात असंख्य क्रांतिकारकांनी फाशीच्या तोंडावरही “वंदे मातरम” ऐवजी दुसरा शब्द उच्चारला नाही. आज या गीताचे दीडशे वर्ष पूर्ण होत असताना संसदेत या विषयावर चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.विधानसभेत आज संपूर्ण वंदे मातरम गाऊन आमदारांनी या देशभक्तिगीतास अभिवादन केले. तसेच पुढील अधिवेशनात या गीतावर स्वतंत्र चर्चा होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वंदे मातरम घोषणेवर बंदी असून आता फक्त भाजपाचे घोषणाच द्याव्या लागतील का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, “वंदे मातरमवर कधीच बंदी नव्हती. उलट वंदे मातरमला कापण्याचे काम काँग्रेसने केले. त्यांच्याच प्रस्तावानुसार संपूर्ण वंदे मातरम न गाता केवळ अर्धे गीत गायले जाऊ लागले.”फडणवीसांनी टीका करत म्हटले की, आज आदित्य ठाकरे जे प्रश्न भाजपला विचारतात ते काँग्रेसलाही विचारायला हवेत. कारण शिवसेना ठाकरे गट आज ज्या पक्षासोबत फिरते, त्याच काँग्रेसने वंदे मातरमचा अपमान केला होता.मुख्यमंत्री म्हणाले, “भाजपच्या शासनकाळात वंदे मातरमचा कायम सन्मान झाला आहे, आणि पुढेही राहील.”
“शिंदे सेना आमचा मित्र पक्ष, आमदार घेण्याची गरज नाही”
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आणखी एका दाव्यावरही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरे यांनी २२ शिंदे गटाचे आमदार भाजपात येऊ शकतात असे म्हटले होते. त्यावर फडणवीस म्हणाले,”असे काही बोलण्याने काही घडत नाही. उद्या कोणी हेही म्हणेल की आदित्य ठाकरेंचे २० आमदार भाजपात येणार. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचे? ती खरी शिवसेना आहे आणि ती आमचा मित्र पक्ष आहे.”भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती आणखी मजबूत होईल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यांमुळे वंदे मातरम विवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकीकडे भाजप वंदे मातरमच्या सन्मानाचा मुद्दा उभा करत आहे, तर महाविकास आघाडीतील पक्ष राजकीय हेतू शोधत आहेत. पुढील अधिवेशनात वंदे मातरम विषयावर होणारी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा देईल, असे संकेत सध्या मिळत आहेत.






















