दौंड | प्रतिनिधी : राहुल आढाव, मयुर साळवे
Times of Maharashtra Desk: दौंड शहरातील प्रभाग क्रमांक १० व १२ मधील विविध महत्त्वाच्या नागरी विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. ५ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनच्या मागण्या पूर्ण होणार आहेत.
या भूमिपूजन कार्यक्रमास प्रभाग क्र. १० चे नगरसेवक योगेश कटारिया व नगरसेविका मनिषा जाधव, प्रभाग क्र. १२ च्या नगरसेविका वैशाली माशाळकर व नगरसेवक निलेश पवार, तसेच प्रभाग क्र. ४ च्या नगरसेविका रुचिता कटारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गौरव कुल, विशाल माशाळकर, माजी नगरसेवक राजेश गायकवाड, दत्ता पवार, निखिल शिंदे, जयंत पवार, रुपेश कटारिया आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
या विकासकामांमध्ये
🔹 साई हॉस्पिटल ते दत्त मंदिर सिटी अपार्टमेंट रस्त्याचे काँक्रिटीकरण
🔹 लुंड घर ते नीलम साठे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण
🔹 मधुरा हॉटेल ते साई पार्क परिसरात फुटपाथ उभारणी
या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या कामांमुळे वाहतुकीची समस्या सुटणार असून नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

भूमिपूजनप्रसंगी बोलताना नगरसेवक योगेश कटारिया म्हणाले,
“दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व टिकाऊ विकासकामे केली जात आहेत. रस्ते, फुटपाथ व मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.”
या कार्यक्रमास नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, आर.पी.आय. (आठवले गट), पी.आर.पी. (कवाडे गट) तसेच मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
या विकासकामांमुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, दौंड शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.






















