संघराज गायकवाड, राहुल आढाव ( दौंड प्रतिनिधी )
शहरातील नगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीमध्ये प्रेतदाहासाठी वापरण्यात येणारी लोखंडी जाळी व संपूर्ण संरचना सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे दौंड नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्मशानभूमीतील प्रेतदाहासाठी वापरली जाणारी लोखंडी जाळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गंजलेली आहे. जाळीची वेल्डिंग तुटलेली, काही ठिकाणी जाळी वाकलेली तर आधारस्तंभ कमकुवत झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रेतदाहाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी हीच जाळी महत्त्वाची असताना तिची सद्यस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रेतदाहाच्या वेळी या जाळीवर मोठा भार येतो. मात्र सध्याच्या स्थितीत ही जाळी अचानक कोसळल्यास स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
संवेदनशील क्षणी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय स्मशानभूमीतील काही भागांमध्ये सिमेंटचा भराव निखळलेला असून लोखंडी भाग उघडे पडलेले आहेत. मूलभूत आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य असताना, इतक्या महत्त्वाच्या व भावनिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणीही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नगरपालिका फक्त कर वसुलीमध्ये सक्रिय असून मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यापूर्वीही या समस्येबाबत तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्मशानभूमीतील प्रेतदाह जाळीची तातडीने दुरुस्ती करून नवीन, मजबूत आणि सुरक्षित लोखंडी संरचना उभारण्यात यावी. तसेच संपूर्ण प्रेतदाह व्यवस्थेची सखोल पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुधारणा कामे त्वरित हाती घ्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दौंड शहरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.






















