निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आज केली. खासदार भास्करराव भगरे सर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शिवसेनेचे तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आज चांदोरी सायखेड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी चांदोरीचे सरपंच विनायक खरात, संदीप आबा टरले, सायखेड्याचे शरदनाना कुटे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. करंजगाव येथील गोदावरी नदीवर जास्त उंचीचा नवीन पूल बांधावा व सध्या काम चालू असलेल्या रस्त्याला पूरपाण्याचा विसर्ग होण्यासाठी अधिकच्या मोऱ्या बांधाव्यात अशी मागणीही खंडू बोडके पाटील यांनी यावेळी खासदार भास्करराव भगरे सर व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली.






















