मयूर साळवे, संघराज गायकवाड ( दौंड प्रतिनिधी ) : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात बदल करून पालेभाज्या व पूरक आहाराचे प्रमाण वाढविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे निवेदन देण्यात आले.
महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी सांगितले की, सध्या इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १०० ग्रॅम तर सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम तांदूळ शिजविण्याची तरतूद आहे. मात्र अनेक विद्यार्थी इतका भात खात नसल्याने अन्न वाया जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे तांदळाचे प्रमाण निम्म्याने कमी करून त्याऐवजी पालेभाज्या, कडधान्ये व इतर पोषक घटकांचा समावेश वाढवावा. पूरक आहारातही वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या बदलासाठी स्वतंत्र अतिरिक्त निधीची गरज नसून तांदळाचे प्रमाण कमी करूनच सुधारणा शक्य असल्याचे महासंघाने स्पष्ट केले. योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तसेच “मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना” सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली. निवेदन शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले.






















