विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांकडे वेळीच लक्ष देवून आपल्या मुलांना बालवयातच चांगले संस्कार द्यावेत तसेच मुलांनी एआय तंत्रज्ञानाचा चांगल्या गोष्टी तसेच अभ्यासासाठी योग्य वापर करुन ध्येय प्राप्तीसाठी वेळ द्यावा असे प्रतिपादन गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ यांनी केले.
केसुला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित रायसीना इंग्लिश स्कूल, सुशी या शाळेचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जवंजाळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गर्जे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक हिमांशू नागरे, निखिल वाघमारे, गणेश घायतिडक, नितीन बारगजे, पत्रकार विनोद नरसाळे, पत्रकार विनोद पौळ, गोपाल शर्मा, साईनाथ गावडे, शर्मा मॅडम, राजेंद्र सांगळे, सरपंच तुकाराम तळतकर, सुनील औटे, सतीश पवार सह आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे पुजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय राठोड यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या मागील दहा वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची रंगत अधिकच वाढवली. तसेच स्वराज्यरक्षक, महापराक्रमी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर चित्तथरारक देखावा सादर करुन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
तसेच यावेळी मोबाईल बुरी बला सह हिंदी, मराठी गिंतासह धार्मिक गाण्यावर नृत्य सादर करुन रंगीबेरंगी वेशभूषा, तालबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विशेषतः लहानग्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये, देशभक्तीपर गीते, नाटिका व समूह नृत्य यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांमध्ये पारंपरिक, देशभक्तीपर तसेच आधुनिक शैलींचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
त्यांच्या निरागस सादरीकरणामुळे उपस्थित पालक आणि ग्रामस्थ भारावून गेले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन शाळेचे संचालक मा. विजय राठोड यांनी केले. आकर्षक डेकोरेशन, प्रभावी बॅकग्राऊंड व्यवस्था आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरध्वज औटे, आकाश सर आणि शिवकन्या भोसले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा मिस, अनिल सर, नीता मिस, वैशाली मिस, रेणुका मिस, शुभांगी मिस, सोनाली मिस, स्वप्निल माने आणि रोशन सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर चित्तथरारक देखावा सादर
पाहुनी शौर्य तुमच्या पुढे मृत्यू ही नतमस्तक झाले, स्वराज्याच्या मातीसाठी माझे शंभूराजे अमर झाले. देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।। स्वराज्यरक्षक, महापराक्रमी, धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर चित्तथरारक देखावा सादर करुन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.






















