गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पुणे विभागात उत्कृष्टतेची परंपरा कायम राखली आहे.
या वर्षी 75 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी यशस्वी ठरले. मराठी विषयात 9 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष कामगिरी केली असून विषयाचा सरासरी निकाल 94.11 टक्के लागला आहे. सामाजिक शास्त्र विषयात श्वेता ढेरे आणि सोहम ढोरमारे यांनी शंभर गुण मिळवून विद्यालयाचा मान उंचावला.
एकूण निकालात साक्षी भागवत पटाईत हिने 97 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर शिवम नागरगोजे (96.60%) द्वितीय आणि श्रेयश दातीर (96%) तृतीय क्रमांकावर राहिले. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत हे महत्त्वाचे घटक ठरले.
विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख रेवननाथ मंचरे, सामाजिक शास्त्र तज्ञ विजयकुमार सोनवणे तसेच रामनाथ वायाळ, अरुण राठी, अस्मिता लांडगे, सागर शेंदगे आणि पुनम फेसरडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्राचार्य विजयकुमार भोसले, उपप्राचार्य एस.पी. वाघमारे, शिक्षकवृंद व पालक समितीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नवोदय विद्यालयाने पुन्हा एकदा गुणवत्ता आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे.






















