दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे भीम महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि सम्यक तथागत सोशल अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले आणि दोन्ही महान समाजपुरुषांना अभिवादन केले. समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास आयोजकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन खवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे जिल्हाध्यक्ष तथा सम्यक तथागत सोशल अँड कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच समितीचे अध्यक्ष शशांक गायकवाड आणि उपाध्यक्ष दिगंबर यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) दौंड शहर व तालुका येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मता आणि सेवा भाव अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.






















