पुणे (मुज्जम्मील शेख) : समाजसेवा आणि परोपकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लष्कर परिसरातील समाजसेवक मनजितसिंग विरदी यांना अमेरिकेतील Louisiana Research University कडून ‘डॉक्टरेट इन सोशल वर्क अँड फिलॅन्थ्रॉपी’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या ऑनरिस नॉमिनेशन अॅडव्हायझरी कमिटीच्या शिफारशीनुसार तसेच सिनेट आणि कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनंतर विरदी यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला. गेल्या २७ वर्षांपासून कॅन्सरग्रस्त, निराधार, पीडित आणि विविध व्याधींनी त्रस्त नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.
विरदी यांना आजपर्यंत ३०० हुन अधिक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.
विरदी ह्यांची संस्था कोणत्याही देणगी घेऊन काम करत नाहीत तर ते स्व खर्चाने हे सर्व सामाजिक काम करत आहेत.
याबाबत बोलताना मनजितसिंग विरदी म्हणाले, “महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. या भूमीने आम्हाला सर्व काही दिलं आहे. त्यामुळे समाजासाठी काहीतरी परत देणं हीच खरी उतराई आहे.” कॅन्सरग्रस्त आणि निराधारांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्यातच जीवनाचा खरा अर्थ सापडतो, असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या सामाजिक कार्यामागील प्रेरणा कुटुंबाकडून मिळाल्याचे सांगताना विरदी म्हणाले, “माझे आजोबा, आई आणि आजी यांनी नेहमीच समाजासाठी काम करण्याचे संस्कार दिले. महाराष्ट्राने आपल्याला घडवलं आहे, त्यामुळे समाजासाठी काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे, हे त्यांनी शिकवलं.”
फाउंडेशनच्या नावाबाबत सुरुवातीला मनात संभ्रम होता. मात्र, “लोक काय म्हणतील यापेक्षा तू काय करतोस हे महत्त्वाचं,” असा आईने दिलेला सल्ला आयुष्याला दिशा देणारा ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
कॅन्सरग्रस्त मुलांसोबतचे अनुभव सांगताना विरदी भावूक झाले. “त्या मुलांना चित्रपट दाखवण्यासाठी नेणे, त्यांना खाऊ देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे, यातच आयुष्याचं खरं समाधान आहे. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहिला की मी स्वतःला सर्वात श्रीमंत माणूस समजतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. “तुम्ही खरे हिरो आहात,” असे धर्मेंद्र यांनी म्हटलेले शब्द आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
“आनंद देणं हेच खरं जीवन आहे. समाजासाठी काहीतरी केल्याशिवाय खरे समाधान मिळत नाही,” असा संदेश देत विरदी यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारांची परतफेड गरजू आणि निराधारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






















