सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार आणि उपकृषी अधिकारी रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी मेघा पेढेकर यांनी योजनेची उद्दिष्टे, सेंद्रिय शेतीचे फायदे, रासायनिक निविष्ठांचा कमी वापर, स्थानिक संसाधनांपासून सेंद्रिय खत व जैविक कीडनियंत्रण उपायांची निर्मिती तसेच सेंद्रिय उत्पादनांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) गोकुळ जाधव यांनी पीकेव्हीवाय योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, शेतकरी गट निर्मितीची प्रक्रिया, सामूहिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्धता याबाबत मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळून शाश्वत शेती विकास साध्य होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास बिरोबा महाराज शेतकरी उत्पादक गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून योजनेविषयीच्या शंकांचे निरसन करून घेतले. शेतकरी गटाच्या बळकटीकरणासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे गुळवंच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण झाली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकेव्हीवाय योजनेत सहभागी होऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






















