निफाड: (ओझर) (प्रतिनिधी उत्तम जाधव) NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी निफाड तालुक्यातील ओझर येथील नागरिक व विद्यार्थ्यांनी उपोषण व प्रभात फेरीचे आयोजन केले. या आंदोलनाला जनसेवा मंडळ ओझर आणि काँग्रेस पक्ष ओझर यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
ओझर गावातून सकाळी विद्यार्थी आणि नागरिकांची प्रभात फेरी काढण्यात आली. “शिक्षणातील पारदर्शकता हवी”, “पेपरफुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या”, “केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

फेरीनंतर गावातील मुख्य चौकात एकदिवसीय सांकेतिक उपोषण करण्यात आले.
जनसेवा मंडळ ओझरच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत पेपरफूट होणे ही गंभीर बाब आहे. यामुळे लाखो मेहनती विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी.

काँग्रेस पक्ष ओझरच्या वतीनेही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.
उपोषणात ओझर व परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिक सहभागी झाले होते.






















