देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजांच्या वतीने दिनांक २०जुलै २०२६रोज सोमवारला देऊळगाव राजा संविधानिक न्याय हक्क विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो महिला व समाज बांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. आरक्षणातील अंतर्गत विषमता दूर करून वंचित घटकांना न्याय मिळावा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रम करत मोर्चा बस स्थानक चौकात पोहोचला तेथे आयोजित सभेत विविध मान्यवरांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची गरज सामाजिक न्याय आणि वंचित समाज घटकांच्या प्रतिनिधित्वा बाबत भूमिका मांडली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तयार करण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार संतोष मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की आरक्षणाच्या उपवर्गीकरण संदर्भातील अनंत बदार समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाला असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. राज्यघटनेच्या कलम ३४१ अंतर्गत अनुसूचित जातींसाठी असलेले आरक्षण काही मोजक्या जातींपुरतेच मर्यादित राहिल्याने मातंग समाजासह अनेक वंचित घटक शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वा पासून वंचित राहिल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे अनुसूचित जातींमध्ये उप वर्गीकरण करून आरक्षणाचा न्याय्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे, भारतीय वंचित जन संसदेचे अध्यक्ष डॉक्टर अंबादास सगट, अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे ,उत्तमराव कांबळे, विजय अंभोरे ,सर्जेराव जाधव ,राजेश घोडे, अजिंक्य चांदणे, संजू गायकवाड ,संजय इंचे ,प्रमोद कांबळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते .शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिला. आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते.






















