ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रह्मपुरी-बोरगाव रस्त्यावरील रामदेव बाबा सॉल्व्हेंट्स इथेनॉल प्रकल्पाचा मनमानी कारभार आता परिसरातील नागरिकांच्या जीवावर उठला आहे. या प्रकल्पातून निघणारे अतिधोकादायक, दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट खुल्या नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि शेतजमिनींमध्ये ‘केमिकल’चे विष उतरले असून, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची’ या गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रदूषणाकडे असलेली डोळेझाक थक्क करणारी आहे.
इथेनॉल निर्मितीच्या प्रक्रियेत तयार होणारे रासायनिक पाणी शुद्ध करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, प्रक्रिया करण्याचा अवाढव्य खर्च वाचवण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने शॉर्टकट शोधला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे काळेकुट्ट आणि आम्लयुक्त पाणी लगतच्या नाल्यांमध्ये सोडून दिले जाते. हा नाला पुढे अनेक गावांमधून वाहत जात असल्याने, अवघा परिसर दुर्गंधीच्या विळख्यात सापडला आहे.
हा प्रकल्प केवळ जलप्रदूषणच नाही, तर मानवी जीवितासाठीही आधीपासूनच ‘टाईम बॉम्ब’ ठरला आहे. गेल्या १९ नोव्हेंबर २०२५ मध्ये याच कारखान्यातील इथेनॉल डिस्टिलेशन युनिटमध्ये प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली होती. तब्बल दोन ते तीन किलोमीटरचा परिसर त्या धक्क्याने हादरला होता. एवढी मोठी दुर्घटना घडूनही कंपनी प्रशासन आणि स्थानिक पर्यावरण अधिकारी ढिम्मच राहिल्याने गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कंपनीकडून उघडपणे कायद्याचे उल्लंघन सुरू असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मूग गिळून का बसले आहेत? त्यांना गावकऱ्यांच्या आरोग्यापेक्षा कारखानदाराचे हित अधिक महत्त्वाचे आहे का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या जीवघेण्या प्रदूषणाविरोधात परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. रासायनिक पाणी नाल्यात सोडणे तातडीने बंद न झाल्यास आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास, कोणत्याही क्षणी इथेनॉल प्रकल्पावर धडक मोर्चा काढून कारखान्याला टाळे ठोकण्याचा कडक इशारा स्थानिक शेतकरी संघटना व गावकऱ्यांनी दिला आहे.






















