दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्यासाठी एमएससीबीकडून खोदकाम सुरू असताना मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइनला धक्का लागल्याने ती फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेले आणि लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाशी समन्वय साधला गेला नसल्याने ही घटना घडली. यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






















