गेवराई :(प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) शहर आणि परिसरातील हजारो रुग्णांचा गेली नऊ वर्षे अखंड विश्वास सार्थ ठरवणाऱ्या शारदा हॉस्पिटलच्या नव्या, अत्याधुनिक वास्तूचा स्थलांतर शुभारंभ आणि ९ वा वर्धापन दिन गुरुवारी, ६ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. गेवराई शहरातील नवीन बसस्थानकासमोर उभारण्यात आलेल्या या प्रशस्त वास्तूचे उद्घाटन सौ. शारदा राठोड आणि श्री. अंकुशराव राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या नव्या वास्तूमुळे गेवराई शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आता अधिक सुसज्ज, अद्ययावत आणि दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे.
गेल्या ९ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत डॉ. प्रदीप राठोड आणि डॉ. सौ. प्रियंका राठोड यांनी नेहमीच रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. रुग्णांशी असलेला आपुलकीचा संवाद, योग्य मार्गदर्शन आणि अचूक उपचार यामुळे शारदा हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची एक स्वतंत्र, भक्कम आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. या नव्या वास्तूच्या माध्यमातून रुग्णांना अधिक चांगल्या व प्रसन्न वातावरणात सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा मानस डॉ. राठोड दाम्पत्यानी व्यक्त केला. आधुनिकतेची जोड आणि सेवाभावी दृष्टिकोन यामुळे गेवराईच्या आरोग्य क्षेत्रात एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.
या शानदार सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. नगराध्यक्षा गीता बाळराजे पवार, ह.भ.प. दिलीप महाराज घोगे, ह.भ.प. शिंगटे महाराज, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, सभापती युधाजीत पंडित, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक काळे, डॉ. विजय राठोड, नारायणराव मोटे सर, प्रा. पी. टी. चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर, मित्रपरिवार, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपल्या मनोगतातून हॉस्पिटलच्या पुढील सेवादायी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भव्य कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. सुनील मुंडे यांनी केले, तर सेवानिवृत्त अधिकारी अंकुशराव राठोड यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. डॉ. प्रदीप राठोड, डॉ. प्रियंका राठोड, राहुल मोटे, अतुल होके, तन्वीर अन्सारी आणि सहकाऱ्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
























