पुण्यात मनसेला खिंडार ; काशीफ सय्यद यांच्या फिल्डिंगमुळे साईनाथ बाबरांच्या खंदे समर्थकांनी केला राष्ट्रवादी शप गटात प्रवेश…
पुणे (मुज्जम्मील शेख) : कोंढवा परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा झटका देणारी घटना आज उघडकीस आली आहे. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि पुणे शहर मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे जवळचे मानले जाणारे रोहन गायकवाड यांनी मनसेला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) गळाला लागले आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली असून, मनसेमध्ये अंतर्गत अस्वस्थतेचे संकेत मिळत आहेत.
रोहन गायकवाड हे गेल्या 17 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, कोंढवा भागातील अनेक प्रश्नांवर जमीन पातळीवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कामामुळे त्यांनी स्थानिकांमध्ये चांगली पकड मिळवली होती. त्यामुळेच त्यांच्या अचानक पक्षांतराने साईनाथ बाबर यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
Advertising By Unique Computrs
Advertising By Unique Computrs
काशीफ सय्यद यांची ‘फिल्डिंग’ आली कामी…
गायकवाड यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी पक्षाचे नेते काशीफ सय्यद यांनी मागील काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. सय्यद यांनी सातत्याने संवाद ठेवत आणि विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण करत अखेर गायकवाड यांना पक्षात आणण्यात यश मिळवले. त्यांच्या या ‘फिल्डिंग’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचा एक सक्रिय चेहरा आपल्या गळाला लावला आहे.
मनसेच्या संघटनेवर प्रश्नचिन्ह?
या प्रवेशामुळे मनसेची कोंढवा परिसरातील संघटनात्मक ताकद डळमळीत होण्याची शक्यता आहे. साईनाथ बाबर यांच्यासाठी हा केवळ एक कार्यकर्ता गमावण्याचा प्रश्न नसून, त्यांच्या गटातील अस्वस्थतेचे लक्षण मानले जात आहे. यामुळे मनसेमध्ये अंतर्गत मंथन सुरू झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रवेश…
महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुण्यात संघटना मजबूत करत आहे. अशा वेळी रोहन गायकवाड यांचा प्रवेश पक्षासाठी बळकटी करणारा ठरू शकतो. दुसरीकडे, मनसेला आपली संघटना आणि अंतर्गत धोरणे पुन्हा एकदा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोहन गायकवाड आणि काशीफ सय्यद यांना प्रशांत जगतापंचा मोठा गिफ्ट…
रोहन गायकवाड यांनी पक्षात प्रवेश करतात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उमेदवारी देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. तसेच पत्रकारांनी काशीद सय्यद यांच्या उमेदवारीवर जगताप यांना विचारले असता त्यांनी त्यावर देखील सांगितले “काशीफ सय्यद यांच्या उमेदवारी बाबत कधीच दुमत नव्हतं त्यांची उमेदवारी फायनल आहे.” असे सांगून दोघांना मोठं गिफ्ट मिळाल्या सारखे झाले.
आणखीन मोठा प्रवेश होणार – काशीफ सय्यद
काशीफ सय्यद यांनी बोलताना सांगितले “आमच्या कडे आणखीन काही दिवसात काही नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.”
या वक्तव्यामुळे अनेक नेत्यांचे भुवया उंचावल्या आहेत. नेमका कोणाचा पक्ष प्रवेश होणार याची उत्सुकता आणखीन वाढत चालली आहे.























