हैदराबाद, 19 मे 2025: हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारजवळ असलेल्या गुलजार हाऊस इमारतीत रविवारी पहाटे भीषण आग लागली, ज्यामध्ये काही मुलांसह किमान 17 जणांचा मृत्यू झाला. सकाळी साधारण 6:30 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे आणि अडकलेल्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले.अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि याबाबत तपास सुरू आहे.मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल धक्का व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सुटका कार्य आणि जखमींना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले.केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि माध्यमांना सांगितले की, पोलिसांनी सुरुवातीला आठ जणांच्या मृत्यूची नोंद केली आहे, परंतु ही संख्या पोलिसांकडूनच अधिकृतपणे निश्चित केली जाईल. त्यांनी नमूद केले की मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश आहे, असे पीटीआयने नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने या दुर्घटनेमुळे तीव्र दुख: व्यक्त केले आणि पीडित कुटुंबांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. पीएमओने X वर पोस्ट केले, “हैदराबाद, तेलंगणातील आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुख: झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती संवेदना.
जखमी लवकर बरे होवोत. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”प्रशासन पीडितांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि जखमींना पुरेसे उपचार मिळतील याची खात्री करण्यासाठी कार्यरत आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आगीच्या कारणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.