गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीर, रेशीम शेती कार्यशाळा, सुप्रसिध्द व्याख्याते संजय आवटे यांचे स्व. अजितदादांचा जीवनपट उलगडणारे व्याख्यान, दिव्यांग बांधवांना अनुदान मंजुरीपत्राचे वाटप यांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि.२२ जुलै रोजी सकाळी १० वा. शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गेवराई येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वहावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून बुधवार, दि.२२ जुलै रोजी सकाळी १० वाजता शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गेवराई येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचा शुभारंभ बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे आणि सायं. दै. सिटीझनचे संपादक शेख मुजीब यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, युवा नेते पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित, शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजय पंडित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शहराध्यक्ष दिपक आतकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व. अजितदादा यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.
गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित जनसेवा सप्ताहामध्ये गुरुवार, दि.२३ जुलै रोजी सकाळी १० वाजता गोदावरी सभागृह र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे दिव्यांगांना अनुदान मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, शुभम पवार, तहसिलदार संजय सोनवणे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.२४ जुलै रोजी सकाळी १० वाजता गोदावरी सभागृह, र. भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे रेशीम शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यशाळेत रेशीम संशोधन केंद्र, परभणीचे प्रभारी अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे मार्गदर्शन करणार असून सरपंच तथा रेशीमरत्न शेतकरी कालिदास नवले आणि तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.२४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुप्रसिध्द व्याख्याते तथा लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, दि.२६ जुलै रोजी शारदा प्रतिष्ठान आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबीरात अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबरपासून निर्मित अत्यंत हलके व मजबुत कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप होणार आहे. या सर्व कार्यक्रमांची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी देऊन सर्व कार्यक्रमांना नागरीकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.






















