पुणे – शहरातील भवानी पेठ परिसरातील सर्वसामान्य, तसेच अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गेल्या २३ वर्षांपासून आर्किड स्कूल चालवण्यात येत आहे. अत्यंत माफक शुल्क घेऊन या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, दुसरीकडे अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना रोजगार प्राप्त होत आहे. शाळेचा निकाल देखील दरवर्षी १०० टक्के लागतो. असे असतानादेखील काही समाजकंटक मंडळी ही शाळेवर धादांत खोटे आरोप लावून १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलू पाहत आहेत. विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी ही शाळा कायम सुरु राहणे गरजेचे आहे, असे असतानाही काही बिल्डरच्या दबावाखाली बरखास्त झालेल्या सोसायटीचे काही बेकायदेशीर सदस्य शाळा बंद करण्यासाठी सातत्याने पत्रकार व अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवत आहेत. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतली आहे. शाळेची १०० टक्के वस्तुस्थिती आम्ही या ठिकाणी देत आहोत….
मी शाहिदा नासीर खान नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेची सचिव असून, या संस्थेअंतर्गत भवानी पेठ येथे आर्कीड स्कूल चालवली जात आहे. या शाळेला शिक्षण विभागाची अधिकृत मान्यता असून, शाळा चालवताना कुठलाही नियमभंग केला जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जय सहकारी हाऊसिंग सोसायटी भवानी पेठ या पुणे शहर उपनिबंधकांनी बरखास्त केलेल्या हाऊसिंग सोसायटीची बेकायदेशीर अध्यक्ष रुक्साना महंमद हुसेन फल्लाह ही शाळेवर धादांत खोटे आरोप करीत आहे. केवळ एका बिल्डरला लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित महिला व सोसायटीचे काही बेकायदेशीर सदस्य हे शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी घाणेरडा खेळ खेळत आहेत. आमच्या संस्थेचा सोसायटीच्या विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या शाळेला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. तसे न झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटले जाण्याची भीती आहे.
बरखास्त हाऊसिंग सोसायटीची बेकायदेशीर चेअरमन रुक्साना महंमद हुसेन फल्लाह आणि काही सदस्य हे शाळेसंबंधी सातत्याने खोटा प्रचार करीत आहेत. शाळेची इमारत धोकादायक नसतानाही खोटी कागदपत्रे दाखवून सर्व नागरिक व पत्रकारांची दिशाभूल केली जात आहे.
पुणे महानगरपालिकेने एक वर्षापूर्वी सोसायटीचे सदस्य गणेश लांडगे यांना २६८ ची नोटीस पाठवून सोसायटीची बिल्डिंग धोकादायक असल्याचे सांगितले होते. गणेश लांडगे यांनी पुणे महानगरपालिकेला त्याचा जवाब दिलेला आहे. त्यानंतर ८ एप्रिल २०२५ रोजी महानगरपालिकेने सोसायटीच्या सर्व सदस्यांना व रहिवाश्यांना २६५ (अ) ची नोटीस देऊन आपापल्या घरांचे स्ट्रक्चरल आ ंडीट करून घ्या, अशी नोटीस बजावली होती. यानंतर आर्कीड स्कूलचे २ बंगले व सोसायटीतील ४ बिल्डिंगचे स्ट्रक्चरल आडीट करण्यात आले व त्याची सर्व माहिती ही मनपा अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व माहितीची तपासणी केली व त्या बाबतचे पत्र सोसायटीचे एक सदस्य गणेश लांडगे यांना दिलेले आहे. विशेष बाब म्हणजे सोसायटीतील इमारतींचे स्ट्रक्चरल आडीट हे बिल्डरने २०२३ साली केले होते, तेही जेंव्हा सोसायटीने बिल्डरशी रिडेव्हलपमेंटचा करारच केलेला नव्हता तेंव्हा. हा प्रकार बिल्डरने कोणत्या अधिकारात केला, तेही सोसायटीने सांगणे गरजेचे आहे. एव्हढेच नाही तर करार होण्यापूर्वीच बिल्डरने कालेज आफ इंजीनियरिंग पुणे (COEP) कडे स्वतःच्या लेटर हेडवर स्ट्रक्चरल आडीटची परवानगी घेतली. हा प्रकार पूर्ण बेकायदेशीर आहे.
आर्किड स्कूलचे वर्ग आज ज्या ठिकाणी भरवले जात आहेत, ती इमारत अजिबात धोकादायक नाही. आर्कीड स्कूलकडे कालेज आफ इंजीनियरिंग पुणे (COEP) चे चार्टर्ड इंजीनिअर इंद्रकुमार जगताप यांच्या स्वाक्षरीचे पत्र असून, त्यांनी केलेल्या पाहणीत शाळेचे वर्ग ज्या इमारतीत भरतात त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत.
सर्वसामान्य मुलांच्या भवितव्याचा विचार करून अत्यंत माफक शुल्क घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. अशा स्थितीत केवळ एका बिल्डरच्या हाती खेळत बरखास्त झालेल्या सोसायटीची बेकायदेशीर अध्यक्ष व इतर बेकायदेशीर सदस्य हे नाहक शाळेला बदनाम करीत असून, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे.
या उलट बरखास्त झालेल्या जय सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे बेकायदेशीर सदस्यांनी अनेक गैरप्रकार व गुन्हेगारी कृत्ये केलेली आहेत. त्यांनी आजवर तीन बिल्डरसोबत रिडेव्हलपमेंटचे करार केले. नवीन करार करताना जुने करार रद्दही केलेले नाहीत किंवा जुन्या बिल्डरकडून एनओसीदेखील घेतली नाही. शिवाय या बरखास्त सोसायटीचे काही सदस्य पूर्णपणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी अनेकांच्या आयुष्याशी खेळ केलेले आहेत.
विशेष बाब म्हणजे सोसायटीच्या ६५ हजार स्क्वेअर फुट जागे पैकी ९४०० स्क्वेअर फुट जागा ही सोसायटीच्या बेकायदेशीर चेअरमन यांच्या नावावर करण्यात आली. हा व्यवहारदेखील पूर्णपणे बेकायदेशीर असून, गंभीर गुन्हा आहे. याशिवाय सोसायटीच्या बेकायदेशीर सदस्यांनी सोसायटीची ५ हजार स्क्वेअर फुट जागा ही एका ओवेरा बिल्डरला विकली आहे. सोसायटीच्या सदस्यांना हे करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर व गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. विशेष बाब ही की, सोसायटीचे हे बेकायदेशीर सदस्य आमच्या शाळेच्या विरोधात २०१९ साली उच्च न्यायालयात गेले होते. त्या ठिकाणी मा. न्यायालयाने आमच्या शाळेच्या बाजूने निकाल दिलेला आहे. एव्हढेच नाही तर शाळेची इमारत बेकायदेशीर असेल तर स्थानिक मनपा प्रशासनाने बिल्डिंगवर कारवाई करावी, असे निर्देश दिले. त्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी खुद्द येऊन आमच्या शाळेच्या इमारतीची पाहणी केली. कागदपत्रे तपासली व शाळा पूर्णपणे अधिकृत असल्याचा निर्वाळा दिला. एकीकडे सोसायटीची बेकायदेशीर चेअरमन व सदस्य म्हणतात की आमची शाळा बेकायदेशीर आहे तर याच सोसायटीच्या सर्व सदस्यांनी आमच्या संस्थेशी करारनामा केला. जर शाळा बेकायदेशीर होती तर मग सोसायटीने आमच्याशी करारनामा कशाला केला असता. आता हेच सदस्य पत्रकार परिषद घेऊन शाळा बेकायदेशीर असल्याचे म्हणत आहेत. याचा अर्थ हे सर्व सदस्य त्यांनीच केलेल्या कराराला चुकीचे म्हणत आहेत. यावरून या सदस्यांचा बनावटपणा उघडा पडतो आहे.
👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆
सोसायटीचे बेकायदेशीर सदस्य सातत्याने बिल्डरशी संधान सांधून शाळा बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे हे सदस्य शाळा बंद करायला निघाले आहेत, परंतु दुसरीकडे बरखास्त सोसायटी अध्यक्षांनी सोसायटीमध्ये बेकायदेशीररित्या भाडेकरू ठेवले आहेत, तर दुसरीकडे त्यांचे स्वतःचे ब्युटी पार्लर व मसाज पार्लरदेखील सुरू आहे.
अशाप्रकारे गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, तसेच शाळा बंद करण्यासाठी प्रयत्न करून विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास दिल्याबद्दल बरखास्त सोसायटीच्या बेकायदेशीर सदस्यांवर कठोर कारवाई केली जावी, यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री मा. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, शिक्षण मंत्री मा. दादा भुसे साहेब यांच्याकडे मागणी करणार आहोत.