‘100 टक्के निकाल’ की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने जाहीर केलेल्या तथाकथित “100 टक्के निकाल” बाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेने केलेल्या 100% निकालाचे वृत्त निखालस खोटे असून काही विद्यार्थी अनुत्तीर्ण असून देखील संस्थेने 100% निकालाच्या खोट्या बातम्या माध्यमांकडे दिल्यात यामाध्यमातून संस्था. एकीकडे पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करतेच मात्र यांचा प्रताप प्रसार माध्यमांतही थांबले नाही. दाव्यामागील आकडेवारी, निकष आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये तफावत असल्याचा आरोप काही पालक व जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सदर संस्थेने जाहिरातबाजी आणि प्रसिद्धीसाठी निकालाचे सादरीकरण दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने केल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर हा प्रकार केवळ नैतिकतेचा भंग नसून विद्यार्थी व पालकांचा विश्वासघात मानला जाऊ शकतो.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कोणतीही संस्था निकालाचे चुकीचे किंवा अपूर्ण चित्र सादर करून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करत असेल, तर त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इतर शैक्षणिक संस्थांनाही फटका बसतो.
दरम्यान, संबंधित संस्थेने जाहीर केलेल्या निकालाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांची खरी संख्या, परीक्षेला बसलेले विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि जाहिरातींमधील दावे यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जर चौकशीत जाणीवपूर्वक दिशाभूल, खोटी जाहिरात किंवा पालकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदी तसेच ग्राहक संरक्षण आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याबाबतीत संस्थेकडे माहिती घेतली असता संस्थेने कोणत्याही प्रकारची यामध्ये उत्तर दिले नाही.
“शिक्षण हे सेवा क्षेत्र आहे की प्रसिद्धीचा बाजार?” असा सवाल आता उपस्थित होत असून, संबंधित प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील भागात आम्ही या मधील संस्था आणि संस्थाध्यक्ष यांच्या नावासह सदर बातमी प्रकाशित करू.
भाग १
क्रमशः






















