नवाजिश चौकात जीवघेणा धोका – एमएसईबीची तुटलेली केबल बनली नागरिकांसाठी संकट!
पुणे कोंढवा :- कोंढव्यातील नवाजिश चौक परिसरात एका निष्काळजीपणामुळे हजारो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एमएसईबीची वीज केबल रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत पडलेली असून, त्यामुळे अपघाताचा आणि विजेचा धक्का लागण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनधारक जातात. या चौकाजवळच तीन शाळा असल्यामुळे लहान मुलांचा सतत वावर असतो. तसेच या रस्त्यावर मुख्य चौक असल्यामुळे नागरिकांची प्रचंड रहदळ असते, त्यामुळे हा तुटलेला वायर जीवघेणा सापळा ठरत आहे.
प्रशासन समवेत स्थानिक नेतेही बेफिकीर
स्थानिक नागरिक तौकीर शेख, ज्यांची चिकन शॉप या चौकात आहे, यांनी जबाबदार नागरिक म्हणून ही बाब तात्काळ एमएसईबीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच माजी नगरसेवक गफूर पठाण आणि त्यांचे जावई जावेद पठाण यांनाही या समस्येबद्दल सांगण्यात आले. परंतु अनेक दिवस उलटून गेले तरीही या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही.
तौकीर शेख यांनी सांगितले की,
“मी हे अनेक ठिकाणी कळवलं, पण आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही. या रस्त्यावरून लहान मुले व नागरिक रोज जातात. काही अपघात आणि नागरिकांचा जीव गेल्यानंतरच लक्ष दिलं जाईल का?”
स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि एमएसईबीकडे विनंती केली आहे की, त्यांनी तत्काळ या केबलची दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडावी.
स्थानिक माध्यम प्रतिनिधींनीही ही बाब गंभीरतेने घेत, संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशी सर्व नागरिकांची अपेक्षा व्यक्त केली आहे.



















