दौंड प्रतीनिधी- (संघराज गायवाड,मयुर साळवे)
दौंड शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील मेन रोडलगत पाईप लाईनचे काम मागील १५ ते २० दिवसांपासून रखडलेले आहे. या कामाच्या अर्धवट अवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असतानाच परिसरात पाणी साचून गलिच्छपणा व दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथरोग पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगरपालिकेकडे तक्रारी नोंदवल्या; मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पाणीटंचाईचे सावट असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. नगरपालिका प्रशासनाची बेफिकिरी आणि ढिसाळ कारभार यामुळे शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत चालल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
शहरवासीयांची ठाम मागणी आहे की, हे काम तातडीने पूर्ण करून पाण्याचा अपव्यय रोखावा तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी जबाबदारांवर कारवाई करावी.
👉 दौंडकरांचा सवाल – “नगरपालिका अजून किती दिवस बघ्याची भूमिका घेणार?”






















