संघराज गायकवाड, मयुर साळवे ( दौंड प्रतिनिधी ) : तालुक्यात झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) या निवडणुकीत जोरदार कामगिरी करत आपले राजकीय बळ पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
दौंड पंचायत समितीच्या एकूण 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 8 जागा जिंकत संख्याबळाच्या दृष्टीने आघाडी घेतली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 6 जागा मिळवत तालुक्यात आपली भक्कम उपस्थिती दाखवून दिली आहे. भाजपला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेले यश हे स्थानिक राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण 7 जागांपैकी तब्बल 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला असून भारतीय जनता पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे जिल्हा परिषद स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी विजयी जल्लोष पाहायला मिळाला. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने मतदारांचे आभार मानत विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या निवडणूक निकालांचा परिणाम येत्या काळातील तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय राजकारणावर निश्चितच मोठा प्रभाव टाकणारा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. दौंड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.






















