स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग मंदिराच्या खाली जाण्याचा प्रस्ताव; भक्तांची तातडीची मागणी मार्ग बदलावा आणि उच्चस्तरीय समिती स्थापन करावी
पुणे: पुण्यातील सुप्रसिद्ध संत श्री शंकर महाराज समाधी मंदिरच्या संरक्षणासाठी भक्त समितीने केंद्रीय पातळीवर तातडीचा पत्रव्यवहार केला आहे. समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री श्री मनोहर लाल खट्टर यांना दिल्लीतील कार्यालयात जाऊन पत्र देऊन विनंती केली आहे की, मेट्रो मार्ग मंदिराच्या खाली जाऊ नये. भक्त समितीचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी सांगितले की,
“प्रस्तावित मेट्रो मार्ग मंदिराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला धोका पोहोचवेल. मंदिराशेजारी असलेले स्वामी समर्थ मंदिर, पवित्र झरा आणि इतर संरचना यांनाही संभाव्य नुकसान होऊ शकते.”
श्री शंकर महाराज यांनी २८ एप्रिल १९४७ रोजी समाधी प्राप्त केली, आणि आजही हजारो भक्त दररोज येथे दर्शनासाठी येतात. समितीने आधीही स्थानिक प्रशासनाला अनेक वेळा अर्ज केला, परंतु तो प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय पातळीवर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
पत्रात भक्त समितीने तीन मुख्य मागण्या मांडल्या आहेत:
1) मेट्रो मार्गाची पुनर्रचना करावी, आणि मेट्रो मंदिराच्या खालून जाऊ नये याची काळजी घेण्यात यावी.
2) सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी.
3) भविष्यातील पिढ्यांसाठी मंदिराचे संरक्षण सुनिश्चित करावे.
समितीने आधीच्या प्रकरणांचा संदर्भ दिला आहे, जिथे शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो मार्ग दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे संरक्षण करण्यासाठी बदलण्यात आला होता. भक्त समितीने त्वरित आणि सकारात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.



















