ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ): राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या वडसा रोडवरील ‘धनेश पान सेंटर’वर अन्न व औषध प्रशासन ( एफ.डी .ए.)
आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली आहे. या छाप्यात इलेक्ट्रॉनिक खर्रा मेकिंग मशीनसह एकूण ३३ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, टपरी चालक धनेश रंजन राखडे (वय ३३, रा. खंडाळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, अन्न सुरक्षा अधिकारी निवृत्तीराव फाळके यांच्या पथकाने वडसा रोडवरील युनियन बँकेच्या मागे असलेल्या धनेश पान सेंटर, टी स्टॉल अँड कोल्ड्रिंक्स सेंटरवर पंचांसह दुपारी १२:४५ वाजता अचानक धाड टाकली. या दुकानाची कसून झळती घेतली असता, तेथे बेकायदेशीरपणे खर्रा तयार करून विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत घटनास्थळावरून २८ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक खर्रा मशीन, ४ किलो वजनाचा तयार खर्रा (अंदाजे किंमत ४,००० रुपये), ‘बाबा १२०’ प्रीमियम च्युइंग टबॅको, मिक्सर तंबाखू आणि ईगल हुक्का साहित्य असा एकूण ३३,०४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी निवृत्तीराव फाळके यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात ‘अन्न सुरक्षा आणि अधिनियम २००६’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक प्रमोद बानवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चनगोले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.






















