जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र मंडळाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध उपयुक्त साहित्य भेट देत समाजासमोर अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.
जून २०२६ महिन्यात ज्या मित्रांचे वाढदिवस होते, त्यांनी केक, फटाके, पार्टी किंवा इतर दिखाऊ खर्च करण्याऐवजी तो निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून गावभर या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
याच मित्र परिवारातील ईश्वरभाऊ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी शाळा परिसरातील उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी मोठी शोभेची रोपे भेट दिली. त्यामुळे शाळेचा परिसर अधिक सुंदर व आकर्षक झाला असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे.
तसेच गावातील समाजसेवक प्रदीपभाऊ रतन ढाकरे यांनी विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे जार भेट दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली आहे.
पृथ्वीराज अंजनसोंडे यांनी शाळेतील प्रत्येक वर्गासाठी दर्जेदार कचरापेट्या भेट दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, शिस्त, टापटीप आणि पर्यावरण संरक्षणाची सवय लागण्यास मोठी मदत होणार आहे.
रांजणी गावचे सुपुत्र व सध्या मुंबई येथे वाहक म्हणून कार्यरत असलेले शालिक कोळी यांनी शाळेसाठी इलेक्ट्रिक फॅन भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या दिवसात दिलासा मिळणार आहे.
स्वतःचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा संदेश देणाऱ्या इलेव्हन स्टार मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केलेले हे कार्य इतर युवकांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थांनी इलेव्हन स्टार मित्र परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त केले. समाजातील प्रत्येकाने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविल्यास शिक्षण क्षेत्राला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.






















