जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासनिक फेरबदल करण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातून उशिरा रात्री या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त झालेल्या सीईओ करिश्मा नायर यांच्यासमोर असणार आहे. मीनल कर्णवाल यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वेग कायम ठेवत त्यात अधिक गती देण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा तरुण, तडफदार आणि उच्चशिक्षित अधिकारी लाभल्याने समाधान व्यक्त होत आहे.
करिश्मा नायर यांचा परिचय
करिश्मा नायर या २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एस्सी. पदवी संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच २ एप्रिल २०२५ पासून त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
मीनल कर्णवाल यांची कारकीर्द उल्लेखनीय
गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात मीनल कर्णवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेमार्फत अनेक लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवले. विशेषतः ग्रामीण विकासाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेले निर्णय आणि प्रशासनिक शिस्त यामुळे त्यांची कारकीर्द जिल्ह्यात गाजली. त्यांच्या बदलीनंतर प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नवीन सीईओ करिश्मा नायर यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






















