Times Of maharashtra : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच ‘गेटवे ऑफ इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ठळकपणे अधोरेखित झाले आहे. या परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoUs) केले असून, या गुंतवणुकीतून राज्यात सुमारे १५ लाख नवीन रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाच्या माध्यमातून विविध देशांतील नामांकित उद्योग समूहांसोबत हे करार करण्यात आले.
विविध क्षेत्रांत गुंतवणुकीचा ओघ
हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलादनिर्मिती, आयटी-आयटीईएस, डेटा सेंटर्स, ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी तसेच डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रांत ही गुंतवणूक होणार आहे. ही गुंतवणूक मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगर या भागांमध्ये पोहोचणार असल्याने औद्योगिक विकासासोबतच स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.
जागतिक उद्योगविश्वाकडून महाराष्ट्राच्या धोरणाचे कौतुक
कार्लसबर्ग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील उद्योगपूरक वातावरणाचे आणि स्थिर धोरणांचे कौतुक केले. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्याशीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन
दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
“भविष्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून महाराष्ट्र जगाचे स्वागत करीत आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीचा पॉवरहाऊस म्हणून महाराष्ट्र उद्योगविश्वासमोर उभा आहे,” – मुख्यमंत्री फडणवीस
गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता
उद्योगपती आणि गुंतवणूकदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, यंदा मागील वर्षांच्या तुलनेत अधिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचे करार होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन तसेच हवा व पाणी गुणवत्तेच्या नियंत्रणातून सर्क्युलर इकॉनॉमी उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील दोन दिवसांत आणखी सामंजस्य करार
दावोस परिषदेत आगामी दोन दिवसांत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक, लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, जहाज बांधणी, ईव्ही आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी उद्योगांशी सामंजस्य करार होणार असल्याची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या MAITRI (महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्ष) या संस्थेमुळे गुंतवणूक सुलभता वाढली असून, यंदा महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओघ लक्षणीयरीत्या वाढल्याचे दावोस येथे स्पष्टपणे दिसून येत आहे.






















