Times of Maharashtra Desk: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन जोरात सुरू असतानाच मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची गुरुवारी मुंबईत अचानक भेट झाली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.गुरुवारी मुंबईतील एका हिंदी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत हा प्रसंग घडला. एकनाथ शिंदे यांची मुलाखत आटोपून ते स्टुडिओबाहेर पडत असतानाच संजय राऊत त्यांच्या मुलाखतीसाठी स्टुडिओच्या दिशेने येत होते. समोरासमोर आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवादन केले.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली. नुकतेच गंभीर आजारपणातून संजय राऊत बरे झाले आहेत. ते आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून तब्येतीची चौकशी केली होती. आज प्रत्यक्ष भेटीतही शिंदे यांनी राऊत यांच्या आरोग्याबाबत विचारणा केली. त्यावर संजय राऊत यांनीही शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली. एक-दोन मिनिटे जुजबी संवाद झाल्यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.
शिवसेनेतील फूट, पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरून निर्माण झालेला संघर्ष आणि त्यानंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातील तीव्र राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत असून संजय राऊतही पत्रकार परिषदांतून शिंदे यांच्यावर जोरदार हल्ले चढवत असतात.
मात्र, आजच्या या भेटीत राजकीय मतभेद बाजूला ठेवत दोन्ही नेत्यांनी सुसंस्कृतपणे संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे “राजकारणात वैयक्तिक सौजन्य अजूनही जिवंत आहे” अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या रणधुमाळीत घडलेली ही भेट केवळ योगायोग की भविष्यातील संकेत? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






















