मुन्नाभाईंना सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते सन्मान…
पुणे : भोई प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने शेख मुन्तखबुद्दीन (मुन्नाभाई) यांना गणेशोत्सवामध्ये निस्वार्थी भावाने अहोरात्र राबून गणेशभक्तांची सेवा केल्याबद्दल सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
विशेष म्हणजे, मुन्नाभाई हे मुस्लिम समाजातून असूनही धर्मभेद न करता गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने ही सेवा बजावत आहेत. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत त्यांनी केलेल्या कार्यामुळे सामाजिक ऐक्य आणि सद्भावना दृढ होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
गणपती बाप्पाच्या उत्सवाची परंपरा उत्साहात, तसेच शिस्तबद्ध आणि मांगल्यपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता असणाऱ्या बाप्पाच्या आराधनेत मुन्नाभाईंच्या निष्काम सेवेमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे गौरवोद्गार या वेळी काढण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार खा. डॉ. सौ. मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, ब्रँड अँबेसिडर श्री डॉ. ए. शिवमणी (भोई प्रतिष्ठान), सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई (अध्यक्ष, भोई प्रतिष्ठान व विश्वस्त विघ्नहर्ता न्यास) यांनी मुन्नाभाईंच्या कार्याचे कौतुक करत, “अशा कार्यकर्त्यांमुळे समाजात सद्भावना टिकून राहते,” असे प्रतिपादन केले.
समाजसेवेतून प्रेरणा घेऊन गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध व सांस्कृतिक मूल्यांचा जप करणारा करण्याचा संकल्प यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.






















