परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :- जयभवानी लोकनाट्य कला केंद्र येथे कला केंद्राच्या आडून सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर परभणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. ही कारवाई १० मे रोजी मध्यरात्री गंगाखेड-परळी रोड परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील महिलांना बोलावून कला केंद्राच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून एका २५ वर्षीय पीडित महिलेची सुटका केली. सदर महिला बार्शी, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी कला केंद्राच्या चालकाविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ३, ४, ५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ हजार २०८ रुपयांचा मुद्देमाल व अन्य साहित्य जप्त केले.
विवेकानंद पाटील यांच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाणे येथे पुढील तपास सुरू आहे.






















