- Times Of Maharashtra Desk : पुणे शेअर बाजारात घरबसल्या मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी पर्वती परिसरातील एका ४८ वर्षीय लाँड्री व्यावसायिकाची तब्बल १ कोटी १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सानिका’चा फोन आणि विश्वासाचं जाळं
तक्रारदार हे पर्वतीमधील लक्ष्मीनगर भागात राहतात. ऑगस्ट महिन्यात त्यांना सानिका गोखले असे नाव सांगणाऱ्या एका महिलेचा फोन आला. गोड आवाजात बोलत तिने शेअर बाजारातील विशेष गुंतवणूक योजनेची माहिती दिली. कमी कालावधीत दुप्पट-तिप्पट परतावा मिळेल, असा दावा करत तिने तक्रारदार आणि त्यांच्या भावाला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले.
त्या ग्रुपमध्ये दररोज शेअर्सचे ‘टिप्स’ नफ्याचे स्क्रीनशॉट आणि इतर गुंतवणूकदारांच्या कथित यशकथा पोस्ट केल्या जात होत्या. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास बसत गेला.
बनावट पोर्टलवर आभासी नफा
प्राथमिक टप्प्यात काही रक्कम गुंतवल्यानंतर तक्रारदारांना एका लिंकद्वारे बनावट ट्रेडिंग पोर्टल दाखवण्यात आले. त्या पोर्टलवर त्यांच्या खात्यात मोठा नफा जमा झाल्याचे दाखवले जात होते. नफा वाढताना पाहून त्यांनी टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये एकूण १ कोटी १५ लाख ११ हजार रुपये जमा केले.
दरवेळी अधिक गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे सांगून आरोपींनी त्यांना प्रोत्साहित केले. मात्र, जेव्हा तक्रारदारांनी नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तांत्रिक अडचण टॅक्स क्लिअरन्स, अतिरिक्त शुल्क अशा कारणांनी पैसे भरण्याची मागणी करण्यात आली.
संपर्क तोडून आरोपी फरार
तक्रारदारांनी आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिला आणि ग्रुपमधील इतर सदस्यांनी संपर्क तोडला. व्हॉट्सॲप ग्रुप डिलीट करण्यात आला आणि दिलेले मोबाईल क्रमांक बंद झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
गुन्हा दाखल; रॅकेटचा तपास सुरू
सायबर पोलिसांनी सानिका गोखले, व्हॉट्सॲप ग्रुपचे अॅडमिन आणि संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. बँक खात्यांची माहिती, व्यवहारांचे तपशील आणि मोबाईल नंबरच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात हे संगनमताने चालणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















