Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच शहरातील राजकारणात पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांमधील आजी-माजी आमदार आणि बड्या नेत्यांनी आपल्या मुला-बाळांना किंवा जवळच्या नातेवाईकांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याने, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नेते तिथेच उमेदवार?
पुण्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या सर्वच प्रमुख पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून नाराजीचे सूर उमटत आहेत. पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांच्या मुलांची नावे आघाडीवर असून, सामान्य कार्यकर्त्याला डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
कोणती नावे चर्चेत?
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच आमदार माधुरी मिसाळ आणि इतरही काही माजी नगरसेवकांच्या मुलांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे हेदेखील निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आमदार चेतन तुपे यांच्या मुलाला हडपसरमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. वसंत मोरे स्वतः आणि त्यांचे पुत्र रुपेश मोरे हे कात्रज-कोंढवा परिसरातून निवडणुकीत उतरणार आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी किंवा मुलाला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा कसब्यात आहे. तसेच उल्हास बागुल यांच्या मुलाचे नावही चर्चेत आहे.
सतरंज्या आम्हीच उचलायच्या का?
पक्षाचे झेंदे खांद्यावर घेऊन फिरणे, आंदोलने करणे आणि बूथ सांभाळणे ही कामे आम्ही करायची आणि निवडणुकीत मलाई मात्र नेत्यांच्या मुलांना मिळायची? असा सवाल आता पुण्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. अनेक ठिकाणी प्रभाग रचना बदलली असली तरी, प्रस्थापित नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्यास सुरुवात केली आहे.
बंडखोरीचा धोका
तिकीट वाटपात जर केवळ नेत्यांच्या नातेवाईकांचा विचार झाला, तर अनेक इच्छुक उमेदवार आणि जुने कार्यकर्ते बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहेत. काही ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची, तर काही ठिकाणी दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना अंतर्गत बंडाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिला आरक्षणाचाही वापर
५० टक्के महिला आरक्षणामुळे अनेक पुरुष नेत्यांनी आपल्या पत्नीला किंवा घरातील इतर महिलांना उमेदवारी देऊन सत्ता घरातच ठेवण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे पक्षातील सक्रिय महिला कार्यकर्त्यांची संधी हिरावली जात असल्याचाही आरोप होत आहे.






















