शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : शिरपूर येथील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने शिरपूर येथील ‘द शिरपूर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँक’चा परवाना सोमवारी रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे आणि भविष्यात उत्पन्नाची कोणतीही ठोस संधी न दिसणे, या प्रमुख कारणांमुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार, ६ एप्रिल २०२६ रोजी कामकाजाची वेळ संपल्यापासून बँकेला कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये ठेवी स्वीकारणे किंवा कर्ज वाटप करणे यांसारख्या सर्व व्यवहारांचा समावेश आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
या निर्णयानंतर, सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक महाराष्ट्र राज्य यांना बँकेचे कामकाज अधिकृतपणे गुंडाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, बँकेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी लिक्विडेटर’ (निस्तारक) नियुक्त करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे शिरपूर परिसरातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता लिक्विडेशन प्रक्रियेनंतर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत काय कायदेशीर पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















