सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) :सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण उत्साहात पार पडले. सिंधखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. भाजप नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक साकारण्यात आले आहे.

यावेळी बोलताना शिवाजीराजे जाधव यांनी अहिल्यादेवींनी काश्मीर ते कन्याकुमारी लोककल्याणाची अनेक कामे केली असून जाती-पातीच्या भिंती तोडून जनतेच्या हिताला प्राधान्य दिल्याचे सांगितले. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. निमगाव-देवपूर ते माहेश्वर (इंदूर) रथयात्रेचेही त्यांनी कौतुक केले.
उदय सांगळे यांनी अहिल्यादेवींनी घाट, बारवा, धर्मशाळा आणि मंदिरांच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा गौरव केला. कल्याणकारी महापुरुषांना जाती-पातीच्या चौकटीत न अडकवता त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक तर धर्मा मुरडनर यांनी आभार मानले.






















