गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर (गढी) येथील शिव शारदा पब्लिक स्कूलमध्ये २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. विशाल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पतंजली योग समितीच्या युवा भारतचे जिल्हा प्रभारी जिजासाहेब नाटकर यांनी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विविध योगासने व प्राणायामांची प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतला.
तर शाळेच्या शिक्षिका विद्या राठोड यांनी इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामांचे मार्गदर्शन करत योगाभ्यास करून घेतला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योग दिन साजरा केला.
कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. योगामुळे निरोगी व संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






















