ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : शासनाने निराधार, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आता डिजिटल सुविधेच्या नावाखाली आर्थिक लुटीचा सामना करावा लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये ‘बी.एस.ए.’ या मोबाईल ॲपद्वारे लाभार्थ्यांचे ई-केवायसी (हयात असल्याचा दाखला) करून देण्यासाठी काही खासगी नेट कॅफे चालक आणि ‘विजय दूधवाले’ यांसारखे व्यावसायिक लाभार्थ्यांकडून प्रति व्यक्ती ३०० ते ४०० रुपयांची बेकायदेशीर वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वास्तविक पाहता, ही योजना पूर्णपणे शासकीय असून यासाठी नाममात्र शुल्क आकारण्याचे नियम आहेत. मात्र, बहुतांश लाभार्थी हे वृद्ध, अशिक्षित आणि दुर्गम भागातील असल्याने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. “आम्हाला शासनाचा भत्ता हवा असल्यास एवढे पैसे द्यावेच लागतील,” अशी भीती दाखवून ही लूट सुरू असल्याचे समजते. या वाढत्या लुटीमुळे गरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या गंभीर प्रकरणाची ब्रह्मपुरीचे प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शासनाने या लुटीची सखोल चौकशी करून दोषी नेट कॅफे चालक आणि संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
अभिप्राय
“संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी (BSA ॲप) पूर्णपणे मोफत असून, यात सामान्य नागरिकांची आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही. ब्रह्मपुरी तालुक्यातील काही नेट कॅफे चालक आणि खाजगी व्यक्ती लाभार्थ्यांकडून बेकायदेशीर पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आम्ही तात्काळ तहसीलदार प्रशासनाला दिले आहेत. जे केंद्र चालक किंवा खाजगी व्यक्ती वृद्ध आणि गरजू लाभार्थ्यांची फसवणूक करत आहेत, त्यांचे परवाने तात्काळ रद्द केले जातील आणि त्यांच्यावर थेट पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे (FIR) दाखल केले जातील. लाभार्थ्यांनी अशा दलालांना एकही रुपया देऊ नये, असे आवाहन आम्ही करत आहोत.”
प्रांत अधिकारी पर्वणी पाटील ब्रह्मपुरी






















