Times of Maharashtra Desk, Pune: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच होम पिचवर मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षातील वाढत्या नाराजीमुळे गारटकर यांनी हा निर्णय घेतला असून, त्यांनी आता इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्याची भूमिका घेतली आहे.
नाराजीचे मुख्य कारण
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने गारटकर यांचा तीव्र विरोध डावलून भरत शहा यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली. उमेदवारी मिळालेले शहा यांचा अद्याप पक्षात प्रवेशही झालेला नाही. याबद्दल गारटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
“नेते म्हणायचं आणि मागणं खेळी करायच्या, हे मला जमत नाही,” अशा शब्दांत त्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली. तसेच, “पक्ष संघटनेला आपली गरज वाटत नाहीत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. “पक्षानं आम्हाला कोललं तर, आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा गारटकर यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.
इंदापूरमध्ये अपक्ष लढत; शरद पवार गट, भाजप, आणि शिवसेना सोबत!
प्रदीप गारटकर यांनी आता इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात स्थानिक स्तरावर मोठी आघाडी केली आहे. गारटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजप, आणि शिवसेना या प्रमुख पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही स्थानिक आघाडी केली आहे.
दत्तात्रय भरणे यांच्या कामकाजावर निशाणा
पक्ष सोडताना गारटकर यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामकाजावरही थेट निशाणा साधला आहे. “मला पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला हे देऊ ते देऊ असे सांगितले, परंतू, मी सर्वसामान्य कार्यकर्ते टिकवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी राजीनामा द्यायचा ठरवले आहे.” असे ते म्हणाले.






















