Times Of Maharashtra Desk : नवी मुंबई बातमी तशी छोटी असली तरी सामाजिक जाणीव आणि तत्पर कारवाईचे दर्शन घडवणारी एक कौतुकास्पद घटना नवी मुंबईतील सेक्टर १४ येथील राधेश्याम सोसायटी परिसरात आज सकाळी घडली.
‘मांजा’ चे दुष्परिणाम
सुट्टीचा दिवस असल्याने सोसायटीतील काही मुले सायकलवर खेळत होती. त्याचवेळी कावळे, पारवे व इतर पक्ष्यांचा कर्कश ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मुलांनी वर पाहिले असता एक पारवा उंचावर मांज्यात अडकून सुटण्यासाठी तडफड करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ही परिस्थिती पाहून मुलांनी तात्काळ प्रसंगाचे गांभीर्य ओळखले. शालेय विद्यार्थी अद्वैत याने आपल्या वडिलांना ही बाब सांगितली. “फायरब्रिगेडला फोन करू का?” असा प्रश्न केल्यानंतर वडिलांनीही तात्काळ होकार दिला. त्यानंतर मुलांनी आपत्कालीन १०१ क्रमांकावर संपर्क साधला.
सदैव तत्पर-अग्निशामक दल

फोनवरील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती व अचूक ठिकाण विचारून घेतले. काही मिनिटांतच पूर्ण तयारीनिशी फायरब्रिगेडची गाडी घटनास्थळी दाखल झाली. फायरब्रिगेडचे अधिकारी, कर्मचारी तसेच काही प्राणीमित्रांच्या मदतीने महत्प्रयासाने उंचावर मांज्यात अडकलेल्या पारव्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
हेच खरे मूल्याशिक्षण
ही घटना साधी वाटत असली तरी मुलांमध्ये पक्षी, निसर्ग आणि सजीवांबद्दल असलेले प्रेम, तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य ठिकाणी मदत मागण्याची जाणीव किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करणारी आहे. विशेष म्हणजे, मुलांच्या एका फोनवर फायरब्रिगेड प्रशासनाने दिलेला त्वरित प्रतिसाद सर्वांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी शालेय विद्यार्थी अद्वैत व त्याच्या मित्रांचे मनापासून कौतुक केले. तसेच अशा प्रकारच्या सामाजिक व पर्यावरणपूरक जाणीवेबाबत शालेय स्तरावर अधिक जागृती व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.






















